Tuesday 30 May 2017

" ह्याला जीवन ऐसे नांव ! "
"""""""""""""""""""""""""
पासपोर्ट :
""""""""""
रात्रीचे 10 वाजले होते. रामनाथ आणि जानकी जेवणं आटोपून शतपावली करुन झोपायची तयारी करत होते. उद्या त्यांचा परदेशात नोकरीला असणारा मलगा त्यांना घ्यायला भारतात येत होता. शतपावली करतांना, त्याच्या सोबत परदेशात जायची स्वप्नं बघत त्यांच्या मनात मागील घटनांचा स्मृतीपट तरळू लागला.
             घरात ती दोघं एकटेच. दोघंही शिक्षकी व्यवसायातून निवृत्त झालेले. दोघांनी नोकरी करत मोठ्या कल्पकतेने, नियोजनातून संसार उभा केला. स्वतःचा बंगला बांधला, मुलाला शिकवलं. साॅफ्टवेअर इंजिनिअर केलं. तो मुळातच हुषार होता. त्याला पहिल्याच प्रयत्नात परदेशात सहज नोकरी लागली. एकटा मुलगा परदेशात जातोय म्हटल्यावर रामनाथ आणि जानकी एकाच वेळी आनंद आणि दु:खात बुडाले. आनंद याचा, की आयुष्यभर जे स्वप्न जोपासलं ते पूर्ण होत होतं. एकूलता एक लाडका लेक परदेशात जात होता आणि दु:ख याचं आता त्यांना पुढे एकटं रहावं लागणार होतं.
" आई, बाबा दु:खी नका होवू. मी लवकर परत येईल. मला भारतातच यायचंय परत. तुमच्याजवळच रहायचंय मला."
मुलाचे हे धिराचे शब्द ऐकून, मनावर दगड ठेवून त्यांनी विनयला निरोप दिला. आता ते त्यांनी बांधलेल्या 'आधार' बंगल्यात एकटेच होते 'निराधार' !
               बघता बघता महिने सरले, वर्ष सरले. पूर्वी रोज सकाळ-संध्याकाळ आई-वडीलांना फोन करणारा विनय पुढे पुढे फोन करायला टाळू लागला. आठवड्यावरुन महिन्यावर आणि आता तर गेल्या दोन वर्षापासून विनयचा फोन नव्हता. विनय आपल्यापासून दूर गेलाय हे वास्तव रामनाथ आणि जानकीनं स्विकारलं होतं. आता त्यांना एकमेकांशिवाय कोणी नव्हतं. दोघं नोकरीला होते. दोघं हिशोबी. त्यामुळे त्यांनी आपल्याभोवती नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या फारसा गोतावळाही जमू दिला नाही. त्याची खंत त्यांना आता उतारवयात जाणवायची. मात्र, चूक त्यांचीच होती.
               मध्येच एकदा विनयचा फोन आला.
" आई, कशी आहेस ? ...... बाबा बरे आहेत नं ? "
" आम्ही बरे आहोत रे. तू सांग, तू कसा आहेस ? .... आणि तू परत कधी येतोयस बच्चू ? ...... अरे, आम्हा म्हाता-यांना किती वाट पहायला लावणार आहेस अजून ? " उत्सुकतेने आई बोलली.
" आई, अगं ऐक नां, आता भारतात परत येणं शक्य होईल असं वाटत नाही गं !"
" काय म्हणतंय पिल्लू माझं? आणि ते कां ?"
" आई..... रागाऊ नको गं, धिरानं ऐक, माझा नाईलाज झाला होता ...... मी इथं लग्न केलयं. इथल्याच मुलीशी. छान आहे ती. ती ही नोकरी करते माझ्या सारखी. आम्ही खूष आहोत."
" काय म्हणालास ऽऽऽऽ लग्न केलं ? ऽऽऽऽ आम्हाला न कळवता ? ऽऽऽऽ तुला काहीच कंसं वाटत नाही हे सांगतांना ? ऽऽऽऽ ...... अरे आम्ही किती स्वप्नं रंगविली होती तुझ्या लग्नाची....?"
असं म्हणत तिच्या डोळ्याला धारा लागल्या. नकळत तिनं फोन ठेवला. नव-याला हे कसं सांगावं याची जुळवाजुळव करत ती बेडरुममध्ये गेली. मनाचा हिय्या करुन तिनं नव-याला सारं सांगितलं. ते हताश झाले. सारं हरवलंय असं वाटून ते स्तब्ध झाले. काय बोलावं त्यांना शब्दच सूचेना. काळ पुढे सरकत होता. बघता बघता दोन वर्ष कुठे निघून गेली ते कळलेच नाही. एकमेकांना सावरत, एकमेकांना जपत ते दिवस काढत होते.
                  एका रात्री ट्रींग, ट्रींग, ट्रींग ...... फोनची बेल वाजली तशी बेडरुममधून रामनाथजींनी आरोळी मारली. " जानकी, अगं बघ तं कुणाचा फोन आहे तो ? ...... केव्हाचा खणखणतोय."
" बघते हो !"
असं म्हणत जानकीने फोन घेतला
" हॅलो, कोण बोलतंय ?"
" आई, मी विनय."
" विनय, कोण विनय ?  ..... आमचा एक विनय होता. तो हरवलाय माणसांच्या गर्दीत."
" आई, तुझा राग समजू शकतोय मी. मला माझी चूक समजलीय. मला माफ करा. मी पुढच्या आठवड्यात येतोय तुम्हाला घ्यायला. तयारीत रहा. आणि हो, तुमचा चिमुकला नातू तुमची वाट पाहतोय इकडं, परदेशात. "
नातूचं नांव ऐकून जानकीबाई थोड्या हुरळल्या. नातू झाल्याचं विनयने कळविलं नाही याचा त्यांना खरं तर रागच आला होता. त्यांचा राग क्षणात वा-यावर विरला. त्यांच्या चेह-यावर आनंद पसरला.
" ये रे राजा, आम्ही येवू तुझ्या बरोबर चार दिवस तिथं रहायला. नातवाचं तोंड पहायला आम्हालाही आनंदच होईल."  तिनं फोन ठेवला.
             बेडरुममध्ये जातांना ती हवेत तरंगत होती. जानकीनं रामनाथला फोनवरचं संभाषण सांगितलं. त्यांच्या  चेह-यावर फारशी उत्सुकता जाणवली नाही. जानकीच्या समाधानासाठी ते एव्हढंच म्हणाले....
" बघू या, पुढचं पुढे !"
विनय येणार म्हणून जानकीबाईला स्वर्ग दोन बोट उरला होता. तिची आईची माया उफाळून आली होती. त्यात नातवाचं मुख बघायला मिळणार होतं. तिनं रामनाथजींची मिनतवारी करुन बाळासाठी झबलं, दुपडं, चुपडं, दागिन्यांची खरेदी केली. सुनेसाठी भरजरी पैठण्या घेतल्या. तिला द्याव्या म्हणून त्यांनी बॅकेतील लाॅकरमधून त्यांच्या सासूने दिलेले दागिने काढून आणले होते. सारी तयारी जवळ जवळ पूर्ण झाली होती. विनय उद्या येणार या कल्पनेनेच दोन्ही हुरळून गेले होते. आजची रात्र त्यांना हुरहुर लावणारी होती. शतपावली करता करता मागील सा-या घटना त्यांना चलतचित्रपटाप्रमाणे आठवल्या.
" मी काय म्हणते ? झालं गेलं विसरु यां आता. नव्याने सुरवात करु या. तुम्ही त्याला काही रागवू नका हं ! " जानकीबाई म्हणाल्या.
" मी कश्याला रागवू ? मला का वेड लागलंय कां जानकी ? तू मात्र, धिराने घे. फार हुरळून जावू नकोस. चल झोपू  या आता. उद्या येतोय नां तो. " रामनाथ म्हणाले. आणि दोघं झोपायला निघाले. रात्री त्यांना केव्हा झोप लागली ते कळलंच नाही.
                  भल्या पहाटे वाजणा-या डोअर बेलनं त्यांना जाग आली. जानकीबाईनं लगबगीनं दार उघडलं.. दारात विनय उभा होता. त्यांचा लाडका विनय. तब्बेतीनं सुधारला होता. तरी आई म्हणालीच.
" किती वाळलास रे विन्या ? ..... सूनबाई खायला देते की नाही ? "
" नाही गं आई. चांगला धट्टा कट्टा आहे मी. तुझी सूनही खूप लाड करते बरं कां आमच्या दोघांचे." असं म्हणत त्याने सोबत आणलेली बॅग आत ओढत आणली. सोफ्यावर बसून निवांत होत त्याने गप्पांची मैफलच रंगविली. दोनदा चहा झाला. मग सर्वानी आंघोळी आटोपल्या. दुपारची जेवणं झाली. वामकुशीला सारी आडवी झाली.
               संध्याकाळी सर्वांनी चहापाणी केली. विनयसोबत दोघं बाहेर फिरायला गेले. पूर्वी फिरायला यायचे त्या, त्या ठिकाणी ते फिरले. गतकाळातील अनेक आठवणींना उजाळा देत त्यांनी आनंद लुटला. रात्रीचं जेवण हाॅटेलात घेवून ते घरी परतले. घरी पोहचल्यावर अलबममधले फोटो पहात त्यांच्या गप्पा रंगल्या. विनयने सहज सुरवात केली.
" आई, बाबा ...... तुम्ही येथे असं एकाकी किती दिवस राहणार ? मला काही हे पटत नाही. आता तुम्ही तिकडे  परदेशात येतंच आहात तर कायमचं तिकडेच चला की ? "
" कायमचं तिकडे ? ऽऽऽऽ अरे कसं शक्य आहे हे ? ऽऽऽऽ आणि हा बंगला  ? ऽऽऽऽ चिज वस्तू ? याचं काय करायचं ?" आईने अनेक प्रश्न विचारले.. बाबा सावध झाले. ते शुन्यात पाहू लागले.
" आई, बाबा .... अहो त्यात काय एव्हढं ? आपण एखाद्या एजंटला सांगू. तो तुमचे पासपोर्ट, कायमचा व्हीसा तयार करुन देईल. हा बंगाला विकून देईल. आपण सारे एकत्रच राहूया. घर कसं भरलेलं वाटेल. तू मस्त नातवाला खेळवायचं आणि देवाचं नाव घ्यायचं." विनय म्हणाला.
विनयने दाखवलेल्या स्वप्नात जानकीबाई हरवल्या. त्यांना परदेशातलं घर खुणावू लागलं होतं.
" विनय; अरे हा बंगला म्हणजे आमचा आधार, आमचा पंचप्राण. तोच विकायचा म्हणजे निराधारच व्हायचं की आम्ही. आणि परदेशात काय आश्रीत म्हणून यायचं कां आम्ही ? " रामथानजींनी आपलं व्यव्हारी म्हणणं मांडलं. त्यांना विनयचा हा प्रस्ताव फारसा पटला नाही.
" बाबा, अहो मी असल्यावर तुम्ही आश्रीत कसे होणर ? ते घर ही तुमचंच घर आहे ... मी माझं कर्तव्य कसं विसरेन."
" मला तर फारसं पटत नाहीयं तुझा सल्ला. तुझी आई काय म्हणतेय ते बघ. "
" अहो, मी काय म्हणते ? आपल्याला तरी दुसरं कोण आहे. विनय म्हणतोय तर करुया तसं. कर रे बाबा तुला पटेल ते. आमची राजी आहे. "
              आईच्या होकारानं विनय खुष झाला. त्या आनंदात त्याला छान झोप लागली. पुढच्या आठ दिवसात त्याने आई-वडिलांना अतोनात खूष ठेवण्याचा प्रयत्न केला. वारंवार एजंटकडे जावून पासपोर्ट, व्हिसा तयार केला. बॅकेतले व्यव्हार पुर्ण केले, सा-या एफ.डी. मोडल्या. दागिने विकून त्यांचेही पैसे केले. बंगल्याला एजंट मार्फत गि-हाईक  लावलं. किंमत मनासारखी मिळाली नाही. परंतू पैसे तात्काळ रोखीने मिळाले. एक मिशन सारखं विनय काम करत होता. आई जुळवाजुळव करत होती. बाबा मात्र हताश होते. रात्रंदिवस कष्ट करुन जमवलेली एक एक वस्तू कवडी मोलाने जात होती. वर्षोन्वर्षात उभा केलेला संसार असा उध्वस्त होतांना पाहून त्यांचं मन तिळतिळ तुटत होतं. मात्र, नाईलाज होता. आता त्यांच्या हातात काही करण्याचं स्वातंत्रही शिल्लक नव्हतं. ते एकाकी होत होते. बघता बघता सारे व्यवहार झाले. परदेशी जाण्याचा दिवस उगवला. साश्रू नयनांनी दोघांनी "आधार"चा निरोप घेतला पुन्हा कधीही परत न येण्यासाठी. आणि ते तिघं टॅक्सीत जावून बसले, विमानतळावर जाण्यासाठी.
              आयुष्यात प्रथमच विमानतळावर आलेले रामनाथ आणि जानकी तेथली झगमगाट पाहून भांबावून गेले होते. ते अवघळून वेटींग रुममध्ये बसले. डोळे विस्फारुन ते तेथील धावपळ, श्रीमंती पाहून अचंबित होत होते. विनय मात्र सराईतासारखा वावरत होता. चौकशी कक्षात येरझारा मारुन तो कागदपत्रांची पुर्तता करत होता. मध्येच आई वडिलांजवळ येवून त्यांची विचारपूस करत होता. आपल्या हाताने त्याने नाश्ता आणि थंडपेय आणून आई-वडिलांना दिला. त्यांच्या चेह-यावरचं समाधान पाहून तोही सूखावला.
" विनोद, तू ही घेरे बाबा .... किती दगदग करतोय पोर आठ दिवसापासून  ?" आई म्हणाली.
" छे गं आई, त्यात कसली दगदग ? ...... माझं कर्तव्यच आहे हे. उलट, तुम्ही मला ही सेवा करु देताय यात माझा स्वार्थच आहे. मला पुण्यच लाभेल यातून !"
विनयच्या या बोलण्याने आईला लेकाचं कौतूक वाटलं. बाबा मात्र हुरळले नाहीत.
" आई, बाबा ..... तुम्ही येथेच बसा. मी येतोय पुढची चौकशी करुन. थोडा वेळ लागेल. चिंता करु नका. हल्ली विमान प्रवासात चौकश्यांचा भारी त्रास असतो. " असं म्हणून विनय विमनतळाच्या गर्दीत हरवला. एक, दोन,.....तीन तास झाले. सहा तास झाले विनय काही येईना. आई, वडिलांची तगमग वाढली. रामनाथजी एक दोनदा चौकशीसाठी गेले. पण, काही थांगपत्ता लागेना. वेळ जावू लागला तशी त्यांची अस्वस्थता वाढली. ते सरळ इमर्जंन्सी चौकशी कक्षात गेले. त्यांनी आपले पाससपोर्ट, व्हिसा तेथील अधिका-याला दाखवला. त्यांचा खूलासा ऐकून त्यांच्या पायखालची जमीन हादरली. त्यांच्या हातातले पासपोर्ट चक्क नकली होते. त्यांनी विनयची सविस्तर माहिती सांगितली. अधिका-यानी ती संगणकात टाकली. आणि त्यांचेही डोळे पांढरे झाले. विनय सहा तासांपूर्वीच हवेत उडून पसार झाला होता. आपल्या म्हाता-या आई-वडिलांना लुबाडून एक घरातलाच चोर फरार झाला होता. अधिका-याने रामनाथजींच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना दिलासा दिला.
" साॅरी सर. प्लिज टेक केअर ! ..... अॅड कंट्रोल युवर सेल्फ. "
अधिका-याच्या सल्यानं रामनाथजी भानावर आले. सर्वस्व हरवून बसल्याच्या जाणिवेनं त्यांच्या पायातले त्राणच हरवले. त्यांची नजर समोर वेटींग रुम मध्ये बसलेल्या जानकीवर पडली. ती साडीचा पदर डोक्यावर ओढत विनयच्या येण्याकडे डोळे लावून बसली होती. तिला कांय सांगावं याचा विचार करता करता त्यांची नजर स्वतःच्या गळयातल्या सोन्याच्या चेनवर आणि हातातल्या अंगठीवर पडली. या रकमा मोडून काही पैसे हातात येतील. त्यात काही दिवस वृध्दाश्रमात काढता येतील हा विचार त्यांच्या मनात डोकावून गेला. ते जड पावलांनी जानकी जवळ गेले. तिच्या डोक्यावर हात फिरवतांना त्यांना आलेलं रडू ते थांबवू शकले नाहीत. त्यांनी हंबरडाच फोडला.
" जानकी आपण लूटलो गेलो गं !" असं म्हणत त्यांनी जानकीला विनयने कसं फसवलं याची माहिती दिली.
" आपलेच दात आणि आपलेच ओठ !" म्हणत त्याही सून्न झाल्या.
विमनतळावरुन उड्डाण घेणा-या विमानाच्या कर्कश आवाजात त्यांचा दोघांचा काळीज पिळवटून टाकणारा हंबरडा हरवून गेला. त्यांच्या हातातून गळून पडलेले नकली पासपोर्ट जमीनीवर उडत होते. ते जणू त्यांना वाकूल्याच दाखवत होते. त्या दोघांकडे दूरुन पाहणारे विमानतळ अधिकारी विमनस्कपणे म्हणाले " ह्याला जीवन ऐसे नांव ! " असला प्रसंग त्यांनाही नविनच होता.

© प्रा.बी.एन.चौधरी.
    (9423492593

मानवतेची जात

मानवतेची जात :
जात पात धर्म मानत नाही
अस आपन नेहमी म्हनत असतो
तरीही प्रतेक अर्जात मात्र
जातीचा रकाना देत असतो.

प्रा.बी.एन.चौधरी.